चाळीसगाव शहर पोलिसांची धडक कारवाई ; पाच गुटखा तस्कर जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त ;

चाळीसगाव ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध व्यापाराविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत गुटखा तस्करीच्या साखळीला मोठा हादरा दिला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात कारमधून प्रतिबंधित मालाची वाहतूक करणाऱ्या पाच संशयितांना अटक करण्यात आली. या कारवाईत कारसह ६ लाख ५७ हजार ७०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जिल्ह्यातील गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ यांना मध्य प्रदेशातून प्रतिबंधित गुटख्याची मोठी खेप चाळीसगावात आणली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी विशेष पथक तयार करून संशयित वाहनावर पाळत ठेवली.

योग्य संधी साधून वाहन अडवून झडती घेतली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण माल आणि वाहन जप्त करत पाच संशयितांना ताब्यात घेतले.

या कारवाईत अजित चांदमल रावलानी, कुबेर शेख कसम, हितेश किशोर पवार, निखिल राजेंद्र कंसवाणी आणि सोहम संजय शिंगणे यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून प्रतिबंधित माल व वाहन जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून तस्करी करून चाळीसगावात आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

या गुटखा तस्करीमागील मुख्य सूत्रधार, पुरवठादार, जिल्ह्यातील वितरणाचे जाळे आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा पोलीस सखोल तपास करीत असून, या तपासातून आणखी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध व्यापाराविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अशा अवैध व्यवसायाची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. चाळीसगाव शहर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून, अवैध धंदे करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला आहे.