भुसावळ (प्रतिनिधी ) - येथील नहाटा कॉलेज चे प्राध्यापक कै. सी.आर. वारके यांचा नातू नील संजय वारके हा वर्ल्ड यूथ क्लाइंबिंग चॅम्पियनशिपसाठी १५ जुलै रोजी रवाना होत आहे. ही निवड खानदेशा आणि महाराष्ट्रासाठी व देशासाठी अभिमानाची बाब आहे. पुण्यात वास्तव्यास असणारा खान्देशी युवा स्पोर्ट क्लाइंबर नील वारके याची आर्को, इटली येथे १८ जुलै ते २६ जुलै दरम्यान होणाऱ्या (वर्ल्डकप)साठी भारतीय संघात निवड झाली आहे. जगभरातील सर्वोत्तम युवा गिर्यारोहक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने नील वारकेच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नील वारके याच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक अमोल जोगदंड,मान्तू मंत्री, इरफान शेख व विकी सरांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि मेहनत तसेच मार्गदर्शक श्रीकृष्ण कडूसकर वेस्ट झोन सचिव, यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नील वारके जागतिक स्पर्धेत भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी करून देश, महाराष्ट्र आणि पुण्याचे नाव उंचावेल, असा विश्वास क्रीडाप्रेमी आणि गिर्यारोहण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.


