भुसावळ, प्रतिनिधी : प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने हजूर साहिब नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) तसेच टनकपूर–हजूर साहिब नांदेड या मार्गांवर नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सेवांमुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अनेक राज्यांतील प्रवाशांना थेट व सुलभ रेल्वे प्रवासाचा लाभ मिळणार आहे. हजूर साहिब नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस उद्घाटन विशेष गाडी (क्र. 07667) दि. 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10.45 वाजता हजूर साहिब नांदेड येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे 4.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे. या गाडीला पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण येथे थांबे देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, टनकपूर–हजूर साहिब नांदेड उद्घाटन विशेष गाडी (क्र. 05012) देखील दि. 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10.45 वाजता टनकपूर येथून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता हजूर साहिब नांदेड येथे दाखल होणार आहे. या गाडीचा मार्ग पीलीभीत, इज्जतनगर, बरेली, बदायू, कासगंज, मथुरा, आग्रा कॅंट, धोलपूर, ग्वालियर, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ललितपूर, बीना, राणी कमलापती, इटारसी, खंडवा, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत आणि पूर्णा या स्थानकांमार्गे असणार आहे. याशिवाय, हजूर साहिब नांदेड–टनकपूर साप्ताहिक एक्सप्रेस (क्र. 17631/17632) नियमित स्वरूपात सुरू करण्यात येत आहे. गाडी क्रमांक 17631 ही दि. 12 जुलै 2026 पासून प्रत्येक रविवारी रात्री 11.40 वाजता हजूर साहिब नांदेड येथून सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी 5.55 वाजता टनकपूर येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 17632 ही दि. 14 जुलै 2026 पासून प्रत्येक मंगळवारी सकाळी 9 वाजता टनकपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4.30 वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचणार आहे. या साप्ताहिक एक्सप्रेसच्या रचनेत 8 स्लीपर, 4 वातानुकूलित 3-टियर, 2 वातानुकूलित 2-टियर, 1 पॅन्ट्रीकार, 4 सामान्य श्रेणी, 2 एसएलआर डबे आणि 1 जनरेटर कारचा समावेश करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक, थांबे आणि अन्य माहिती आयआरसीटीसी व एनटीईएस पोर्टलवर उपलब्ध करून दिली असून, गाड्यांची रिअल-टाइम माहिती एनटीईएस अॅपद्वारे आणि आरक्षणासाठी रेलवन अॅपद्वारे मिळू शकणार असल्याचे सांगितले आहे.


