भुसावळात प्रभू श्रीराम कथेचे भव्य आयोजन; ७ ते १३ जुलैदरम्यान धार्मिक महोत्सव

जयपूरचे प्रसिद्ध कथावाचक पं. (पुण्यवास) श्री मदन मोहनजी महाराज करणार श्रीराम कथेचे निरूपण
भुसावळ ( प्रतिनिधी ) - 

भुसावळ येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रभू श्रीराम कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. ७ जुलै ते सोमवार, दि. १३ जुलै या कालावधीत हा धार्मिक महोत्सव पार पडणार असून, जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध कथावाचक पं. (पुण्यवास) श्री मदन मोहनजी महाराज आपल्या रसाळ वाणीतून दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत श्रीराम कथेचे वाचन व निरूपण करणार आहेत.

पं. पू. श्री मदन मोहनजी महाराज यांनी देशभरात ५०० हून अधिक श्रीराम कथांद्वारे जनजागृतीचे महान कार्य केले असून, श्रीराम कथा, भागवत कथा, शिवमहापुराण तसेच भगवद्गीतेवरील त्यांच्या अभ्यासाची विशेष ख्याती आहे. भुसावळातील या धार्मिक सोहळ्याचे प्रमुख यजमान वस्त्रोद्योगमंत्री नामदार संजय सावकारे राहणार असून, या महोत्सवाचे आयोजन श्री लक्ष्मी व्यंकटेश ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

असा असेल श्रीराम कथेचा कार्यक्रम

दि. ७ जुलै (मंगळवार) : सकाळी ९.३० वाजता श्रीराम मंदिरापासून श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानापर्यंत भव्य कलश यात्रा निघणार आहे. त्यानंतर कथा महात्म्य तसेच सती मोह प्रसंग व शिव-पार्वती विवाह यांचे निरूपण होणार आहे.

दि. ८ जुलै (बुधवार) : नारद मोह आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळा.

दि. ९ जुलै (गुरुवार) : श्रीराम-जानकी विवाहोत्सव.

दि. १० जुलै (शुक्रवार) : श्रीराम वनवास, केवट प्रसंग आणि भरत चरित्र.

दि. ११ जुलै (शनिवार) : श्री हनुमान चरित्र आणि लंका कांड.

दि. १२ जुलै (रविवार) : सकाळी ९.३० ते ११.३० या विशेष वेळेत रामराज्याभिषेक सोहळा, विश्राम हवन व प्रसादी वाटप होणार आहे.

या भव्य धार्मिक महोत्सवाचा सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री राधाकृष्ण प्रभात फेरी मित्र मंडळ, सकल हिंदू समाज भुसावळ तसेच राधेश्याम लाहोटी, संजय अग्रवाल आणि जे. बी. कोटेचा यांनी केले आहे.