भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद : जळगाव रोड परिसरात मध्यरात्री सापळा रचून कारवाई; कट्टा, काडतुसे व चाकू जप्त :

भुसावळ (प्रतिनिधी) : शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली. या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जळगाव रोडवरील हिरो शोरूमच्या मागील भागात दोन इसम गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे व त्यांच्या पथकाने सापळा रचून तपास सुरू केला.
शुक्रवारी मध्यरात्री १२.२० वाजेच्या सुमारास हिरो शोरूमच्या मागील अंधाऱ्या भागात एका इलेक्ट्रिक दुचाकीवर दोन संशयित इसम उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीत आरोपी विशाल दादा सुरवाडे आणि शुभम बबन वैद्य (दोघेही रा. भुसावळ) यांच्या ताब्यातून १० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा, दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत राउंड तसेच ३०० रुपये किमतीचा स्टेनलेस स्टीलचा टोकदार चाकू जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार वारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई, राहुल बेहेनवाल, दीपक शेवरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल वानखेडे यांनी कारवाईत उल्लेखनीय भूमिका बजावली.