भुसावळात जबरदस्ती धर्मांतर प्रकरणाने खळबळ ; आरोपी अटकेत : बुरखा घालण्यास तरुणीचा नकार, अत्याचार व धमक्यांचा आरोप

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्यप्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या आणि शिक्षणासाठी भुसावळ येथे आजोबांकडे राहत असलेल्या 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी नविल शेख (रा. भुसावळ) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती दहावीच्या शिक्षणासाठी भुसावळ येथे वास्तव्यास आली होती. शिक्षणादरम्यान तिची आरोपीशी ओळख झाली आणि त्यातून मैत्री निर्माण झाली. एका कॅफेमध्ये भेटीदरम्यान आरोपीने तिचे छायाचित्र काढून विवाहाचा प्रस्ताव दिला होता. मात्र धर्म वेगळा असल्याचे सांगत तरुणीने विवाहास नकार दिला होता.

तक्रारीनुसार, 16 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीने तिला फोन करून भेटण्यासाठी बोलावले. भेटीस न आल्यास कुटुंबीयांना ठार मारण्याची तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने वरणगाव रोडवरील सुंदरनगर परिसरातील एका खोलीवर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यापुढे 7 मार्च 2026 रोजी आरोपीने दुसऱ्या दिवशी पहाटे तयार राहण्यास सांगितले. विवाहासाठी सोबत न आल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने भीतीपोटी ती आरोपीसोबत गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपीने तिला दीपनगर परिसरातील एका ठिकाणी नेले, जिथे उपस्थित मौलानांकडून कलमा पठण करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला नकार दिल्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तिने कलमा पठण केले आणि त्यानंतर मुस्लिम रितीरिवाजानुसार विवाह लावण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

त्यानंतर आरोपीने तिला सुंदरनगर परिसरातील खोलीत आठ दिवस ठेवले. या काळात बुरखा परिधान करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती तसेच विरोध केल्यास मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

दरम्यान, कुटुंबीय, काही सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने तरुणीची सुटका करण्यात आली. त्यानंतर ती आपल्या मूळ गावी परतली. पीडितेने 10 मे 2026 रोजी सिवनी मालवा (जि. नर्मदापूरम, मध्यप्रदेश) महिला हेल्प डेस्क येथे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर सिवनी मालवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासासाठी प्रकरण भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग केले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 64(2), 127(3), 351(3) आणि 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारती काळे करीत आहेत.