भरधाव मोटारसायकल इलेक्ट्रिक पोलवर आदळली; चालकाचा जागीच मृत्यू ;

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील जोगलखेडा शिवारात भरधाव वेगातील मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि. 12 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर विठ्ठू सोनवणे (वय 34, रा. भानखेडा, ता. भुसावळ) हे त्यांच्या ताब्यातील Honda Shine मोटारसायकल (क्रमांक MH 19 EJ 3447) घेऊन साकगावकडून जोगलखेडा-भानखेडा गावाकडे जात होते. दरम्यान, मौजे जोगलखेडा शिवारातील किशोर पाटील यांच्या शेतालगत असलेल्या चारिमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रिक पोलजवळ त्यांची मोटारसायकल भरधाव वेगात जात असताना नियंत्रण सुटले.

यामुळे मोटारसायकल थेट इलेक्ट्रिक पोलवर आदळून गंभीर अपघात झाला. या अपघातात ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या डोक्यासह शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मोटारसायकलीचेही नुकसान झाले आहे.

या प्रकरणी पोहेकॉ/2715 संजय काशीनाथ भई यांनी फिर्याद दिली असून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे CCTNS गु.र. नं. 99/2026 नुसार BNS कलम 106(1), 281, 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ 2622 वाल्मिक सोनवणे हे करीत आहेत.