भुसावळात गांजाविक्री अड्ड्यावर पोलिसांची धाड; २२ किलो गांजा जप्त, दोघे ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील खडका रोड परिसरातील ताज नगर भागात सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकत तब्बल २२ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत सुमारे ४ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

खडका रोडवरील ताज नगर भागात दोन इसम राहत्या घरातून गांजाची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिल्यानंतर संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनकडे रवाना झाले. पथकाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांची भेट घेत गोपनीय माहितीची खातरजमा केली.

यानंतर पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी गुन्हे शोध पथकातील विजय नेरकर, कांतीलाल केदारे, चंद्रकांत रायपूरकर, योगेश माळी, भूषण चौधरी, सचिन चौधरी, जावेद शाह, प्रशांत सोनार, महेंद्र पाटील आणि अक्षय कोतकर यांना कारवाईसाठी पाचारण केले.

पथकाने शुक्रवार, दि. १५ रोजी सकाळी सुमारे १२ वाजेच्या सुमारास खडका रोडवरील ताज नगर येथे छापा टाकला. संशयित आरोपी अजीज शेख मजिद व सलिम शेख मजिद यांच्या राहत्या घरांची झडती घेतली असता घरामध्ये २२ किलो गांजा आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे ४ लाख ३९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोन्ही संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून गुन्हे शाखेचे उमकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.