भानखेडच्या जंगलात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार, पाच जणांना अटक :

चांदूर रेल्वे परिसरात शनिवारी उशिरा रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही तरुणी तिच्या मित्रासोबत दुचाकीवर फिरण्यासाठी गेली होती. परत येताना पाच जणांनी त्यांना अडवून मारहाण केली आणि पैशांची मागणी केली.

घाबरलेल्या अवस्थेत तरुणीने तिच्याकडे असलेले सुमारे १२० रुपये त्यांना दिले. मात्र त्यानंतर चौघांनी तिच्या मित्राला पकडून ठेवले, तर एकाने तरुणीला जवळच्या जंगलात ओढून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना सुमारे तासभर चालली. त्यानंतर आरोपींनी दोघांनाही रस्त्यावर सोडले आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकारानंतर दोघेही शहरात परतले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तातडीने कारवाई केली आहे. रविवारी पहाटेपर्यंत पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.