ब्रेकिंग – अमळनेरमध्ये गावठी कट्टयातून गोळी सुटून तरुणाचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी): शहरातील अम्लेश्वर नगर परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. गावठी कट्टा हाताळताना अचानक गोळी सुटल्याने अरुण सुरेश महाजन या तरुणाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अरुण महाजन हा स्वतःजवळ असलेला गावठी कट्टा हाताळत असताना अचानक गोळी झाडली गेली. ही गोळी त्याच्या अंगाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.

घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, संबंधित गावठी कट्टा नेमका कुठून आला, हा प्रकार अपघाती आहे की त्यामागे इतर काही कारण आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या घटनेमुळे अम्लेश्वर नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.