भुसावळ (प्रतिनिधी ) -: रेल्वे स्थानकावर येणाऱ्या पठाणकोट (अप) एक्सप्रेसमधून अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सोमवार २३मार्च रोजी मिळताच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) व रेल्वे पोलिस पथकाने तत्काळ सापळा रचून मोठी कारवाई केली.

पठाणकोट एक्सप्रेस स्थानकावर दाखल होताच अधिकाऱ्यांनी डब्यांची सखोल तपासणी सुरू केली. या तपासणीदरम्यान अंदाजे १३ बॅगमध्ये भरलेला लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला. जप्त केलेल्या मालाची किंमत अंदाजे लाखो रुपयांचा असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले आहेत.
या प्रकरणी आरपीएफ पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. जप्त केलेला मुद्देमाल आणि संशयितास पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, रेल्वे मार्गे सुरू असलेल्या अवैध गुटखा वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.


