मोंढाळे ता भुसावळ – महावितरणच्या शिंदी कार्यालयामार्फत मोंढाळे गावात मंगळवार रोजी वीज बिल वसुली तसेच वीज चोरी शोध मोहीम राबविण्यात आली. मार्च महिना असल्याने सर्वत्र वीज बिल वसुलीला वेग आला असून थकबाकीदार ग्राहकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे.

या मोहिमेदरम्यान थकीत बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करून मीटर काढण्याची कारवाई करण्यात आली. शिंदी परिसरात मोठ्या प्रमाणावर थकबाकी व वीज चोरीचे प्रकार आढळत असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक अभियंता श्री. शैलेश आखरे यांनी दिली.
दरम्यान, स्मार्ट मीटर बसविलेल्या आणि ४५ दिवसांपासून बिल न भरलेल्या ग्राहकांची लाईन मीटरमधून बंद करण्यात आली होती. मात्र काही ग्राहकांनी पोलवरून थेट वायर जोडून वीजपुरवठा सुरू केल्याचे निदर्शनास आले. अशा ग्राहकांची तपासणी करून कारवाई करण्यात आली.
स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. त्यानुसार मोंढाळे येथील चार ग्राहकांविरुद्ध विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये महाराष्ट्र पोलीस पोर्टलवर वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर तपशील गोपनीय ठेवण्यात आले आहेत.
या मोहिमेत शिंदी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी श्री. आखरे, पाटील, कापसे, चौधरी, सपकाळे, शिंपी मॅडम, साळुंके मॅडम व इतर कर्मचारी सहभागी होते.
महावितरणकडून सर्व ग्राहकांना वेळेत वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अचूक बिलिंगसाठी गावागावांत स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असून शिंदी गावात हे काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.



