भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ‘स्नेहयात्री प्रतिष्ठान, भुसावळ’ यांच्या वतीने आयोजित ‘स्नेहयात्री करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २१ आणि २२ मार्च रोजी उत्साहात पार पडणार आहे. या स्पर्धेचे पोस्टर प्रकाशन ताप्ती महिला योगा क्लबच्या अध्यक्षा प्रा. डॉ. भाग्यश्री भंगाळे व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.

ही स्पर्धा स्व. डॉ. उमेश खानापूरकर स्मृतिमंच तसेच स्व. राजकुमारी मनोहर जाधवानी स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आली असून, २१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या नाट्यसोहळ्यात प्रेक्षकांना तब्बल १३ एकांकिकांची मेजवानी मिळणार असून भुसावळच्या सांस्कृतिक वातावरणात नवे चैतन्य निर्माण होणार आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि जळगावसह राज्यातील विविध भागांतील एकूण १३ नाट्यसंस्था या स्पर्धेत सहभागी होत असून, त्या आपापल्या उत्कृष्ट नाट्यकृती सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन स्व. लालचंदजी लखीचंद निमाणी सभागृह आणि कृष्णचंद्र सभागृह येथे करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघांना विविध मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये स्व. लालचंद लखीचंद निमाणी स्मृती प्रथम पुरस्कार, गुरुवर्य स्व. रुक्मिणी माधवपूरकर स्मृती द्वितीय पुरस्कार आणि स्व. कलाबाई देविदास ठाकरे स्मृती तृतीय पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच उत्कृष्ट दिग्दर्शन, पुरुष व स्त्री अभिनय, नेपथ्य आणि प्रकाशयोजना या विभागांतही स्वतंत्र पुरस्कार दिले जाणार आहेत.
विशेष म्हणजे, सर्व नाटके प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुली असणार आहेत. भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी आणि नाट्यप्रेमींना दर्जेदार नाट्यप्रयोगांचा आस्वाद मिळावा यासाठी स्नेहयात्री प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशील असल्याचे आयोजकांनी सांगितले.


