भुसावळ (प्रतिनिधी) : साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाच्या ‘साहित्य अकादमी पुरस्कार २०२५’च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. मराठी भाषेतून जळगावचे ज्येष्ठ लेखक-चित्रकार राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्राची आत्मचरित्र श्रेणीत निवड करण्यात आली आहे.
मराठीतून शिफारस करण्यात आलेल्या एकूण ११ पुस्तकांमधून बाविस्कर यांच्या साहित्यकृतीची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. एक लाख रुपये राेख रक्कम, सन्मानचिन्ह (ताम्रपट जाे सत्यजित राय यांनी डिझाइन केला अाहे.) आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जवळपास ३५ वर्षानंतर खान्देशाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार २४ भारतीय भाषांमधील (संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील २२ भाषांसह इंग्रजी व राजस्थानी) सर्वाेत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी दिला जाताे. दरम्यान, राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथनात बाविस्कर यांनी आपल्या चित्रकला प्रवासासोबतच वंचित वर्गातील संघर्षाचे प्रभावी चित्रण केले आहे. हे पुस्तक विशेष गाजले असून त्याचा समावेश एमए अभ्यासक्रमातही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बाविस्कर यांची ही पहिलीच साहित्यकृती आहे.




