चला, सेकंड इनिंग आनंदाने जिंकू या” – समुपदेशक आरती चौधरी यांचे मार्गदर्शन श्रीगुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ, भुसावळ येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

भुसावळ (प्रतिनिधी ) :
श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ, भुसावळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त “चला, सेकंड इनिंग आनंदाने जिंकू या” या विषयावर समुपदेशक आरती चौधरी यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत महिला दिन साजरा केला.

यावेळी बोलताना आरती चौधरी यांनी सांगितले की, आयुष्याची पहिली इनिंग ही शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबीय जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यतीत होते. मात्र आयुष्याची दुसरी इनिंग म्हणजेच “सेकंड इनिंग” ही स्वतःसाठी जगण्याची, आनंदाने व समाधानाने आयुष्य घडवण्याची सुवर्णसंधी असते.

कोणतेही झाड सुरुवातीला रोपटे असते, परंतु मोठे झाल्यावर ते सावली आणि गोड फळे देते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांकडे आयुष्यभराचा समृद्ध अनुभव असतो. हा अनुभव समाजासाठी, कुटुंबासाठी आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन महिलांनीच केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्री ढाके होत्या.

यावेळी संघाचे अध्यक्ष नारायण पाटील, उपाध्यक्ष महादेव हरिमकर, सचिव बी. डी. चौधरी, माजी अध्यक्ष प्रकाश विसपुते, तसेच रामकृष्ण पाटील, रमाकांत पाटील, प्रकाश तायडे, डी. एस. पाटील उपस्थित होते व त्यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.

तसेच सौ. जयश्री विसपुते, शोभा जावळे, सौ. मंगला येवले, साधना मोहरील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लतिका क्षीरसागर यांनी केले.

यावेळी क्रीडा मंडळ भुसावळच्या किरण चौधरी, जयश्री ओक, लता होसकोटे आणि प्रिता पिंगळे या देखील उपस्थित होत्या.