भुसावळ एन.आर.एम.यू. मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला महोत्सवाचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी) – नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एन.आर.एम.यू.) भुसावळ मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम, स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांनी भरलेला “महिला महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून कृष्णचंद्र सभागृह, भुसावळ येथे होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला कर्मचारी भगिनींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व महिला रेल्वे कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमात गीतगायन स्पर्धा, सोलो व ग्रुप डान्स, ओपन माईक, प्रश्नमंजुषा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसेच विविध आउटडोअर गेम्स यांचा समावेश असणार आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
दुपारी २.०० वाजता गीतगायन स्पर्धा, २.३० वाजता नृत्य स्पर्धा (सोलो व ग्रुप), ३.०० वाजता “ओपन माईक – आपली ओळख, आपले विचार”, ३.३० वाजता प्रश्नमंजुषा, तर सायं. ४.०० ते ५.०० या वेळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय संगीत खुर्ची, बलून फोड स्पर्धा, रंगोली तसेच “क्वीन ऑफ द डे” स्पर्धा देखील होणार आहेत.

सर्व स्पर्धांतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार असून कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व महिलांना सप्रेम भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाच्या आयोजनात महिला कार्यकारिणी समितीतील पुष्पा केरकेट्टा, पल्लवी अंबाडे, लीना बांडे, वर्षा जाधव, वनिता जाधव, सुनंदा डांगे, पूजा सोनवणे यांच्यासह इतर सदस्य सहभागी आहेत.

कार्यक्रमास सर्व महिला रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.