जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी येथे सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लहानग्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रभक्तीपर गीतांनी झाली. देशभक्तीपर गाण्यांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पाळणा सादरीकरण, आदिवासी नृत्य आणि विविध गाण्यांवरील नृत्याविष्कारांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळाला.

या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका आशा चौधरी, उपशिक्षिका प्रीती फेगडे, माधुरी चौधरी, उपशिक्षक दीपक सुरवाडे, माजी मुख्याध्यापक भगवान बडगुजर, माजी उपशिक्षक समाधान जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कांचन परदेशी, सदस्य बन्सिलाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड, ग्रामस्थ, पालक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी मोफत स्टेज व मंडपाची व्यवस्था शाळेचे माजी विद्यार्थी जगदीश पाटील यांनी केली, तर साऊंड सिस्टीमची जबाबदारी माजी विद्यार्थी ललित परदेशी यांनी सांभाळली. गेल्या दहा वर्षांपासून ते दोघेही शाळेला सातत्याने सहकार्य करत असून त्यांच्या योगदानाबद्दल ग्रामस्थ व पालकांनी विशेष कौतुक व्यक्त केले.

या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.