भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वे कर्मचारी कल्याण निधीतर्फे भुसावळ विभागात एक दिवसीय मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी भुसावळ येथील कृष्णचंद्र सभागृहात हा उपक्रम उत्साहात पार पडला.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मध्य रेल्वे मुख्यालयाचे मुख्य कार्मिक अधिकारी (औद्योगिक संबंध) अनुराग मेश्राम उपस्थित होते.

या शिबिरात शुभांगी रस्तोगी, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), माइंड अलकोव यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्य, तणाव व्यवस्थापन आणि समुपदेशन या विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करत सकारात्मक जीवनदृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले. दीर्घ श्वसन, स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे तसेच दैनंदिन जीवनात मानसिक संतुलन राखण्यासाठी उपयुक्त अशा सोप्या व प्रभावी उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
कृष्णचंद्र सभागृह येथे आयोजित पहिल्या सत्रात सुमारे 300 रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या सत्रात सुमारे 85 कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक समुपदेशनाचा लाभ घेतला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी या उपक्रमामुळे त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी दिलीप आर. खरात, सर्व सहायक कार्मिक अधिकारी, कर्मचारी व कल्याण निरीक्षक तसेच भुसावळ मंडळातील कर्मचारी कल्याण निधी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.



