भोळे महाविद्यालयात विद्यापीठातर्फे महिला व युवतींसाठी आर्थिक साक्षरता आणि आर्थिक नियोजन कार्यशाळा संपन्न


भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतीच युवती आणि महिलांसाठी आर्थिक साक्षरता आणि आर्थिक नियोजन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाने प्रायोजित केलेल्या या कार्यशाळेचे आयोजन भुसावळ शहरातील एच आर वायकोळे इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी आणि दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य मा. श्री. दिनेश चव्हाण हे उद्घाटक म्हणून, अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या प्राचार्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एच आर वायकोळे इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन चे संचालक प्रा. डॉ. निखिल वायकोळे, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी च्या अध्यक्षा सौ. सीमा सोनार तसेच सचिव सौ. योगिता वायकोळे उपस्थित होत्या.
सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन झालेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटनपर मनोगत व्यक्त करीत असताना मा. दिनेश चव्हाण यांनी आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून कुटुंबाच्या खर्चाचे आर्थिक नियोजन केल्यावर महिला आणि कुटुंबही किती यशस्वी होऊ शकतात याची अनेक उदाहरणे देऊन आर्थिक साक्षरतेचे महत्त्व स्पष्ट केले.
उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी उपस्थित महिला आणि युवतींना आर्थिक साक्षरतेच्या मधातून सक्षम, आत्मनिर्भर आजी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची अनेक उदाहरणे दिली. त्या सोबतच काटकसर करत संघर्ष केलेली महिलांची पिढी आणि डिजिटल साक्षरता संपादन करुन मोबाईल च्या वापराने ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या युवतींनी एकत्र येऊन आर्थिक साक्षरता आणि नियोजनाचे प्रशिक्षण घेतले तर कुटुंब आणि महिला वर्ग खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल असे मत व्यक्त करीत छोट्या छोट्या बचतीची सवय करणे, आर्थिक संपन्नतेचे उद्दिष्ट ठरवणे आणि जागरूकता ठेवत आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे असे आवाहन केले.
या कार्यशाळेत आर्थिक जागरूकता व उद्दिष्ट निर्मिती या विषयावर प्रख्यात गुंतवणूक सल्लागार श्री कुणाल महाजन यांनी, स्मार्ट बजेटिंग, बचत आजी आपत्कालीन निधी या विषयावर डॉ. रोहिणी बोडस यांनी, आर्थिक सुरक्षितता, विमा व निवृत्ती नियोजन या विषयावर प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी आणि गुंतवणुकीची ओळख आणि संपत्ती निर्मिती या विषयावर श्री ओंकार कस्तुरे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्याने दिलीत.
कार्यक्रमाचे समारोप प्रसंगी एच आर वायकोळे इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन भुसावळ चे संचालक प्रा. डॉ. निखिल वायकोळे यांनी कार्यशाळेचे आयोजन करीत असताना महिला आणि युवतींना आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणी आणि व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता आणि नियोजनाचे ज्ञान आवश्यक असल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या संचालक आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट करून दिल्या मुळे विद्यापीठाने ह्या कार्यशाळेचे प्रायोजकत्व स्वीकारले असे स्पष्ट केले. तसेच शहर आणि परिसरातील अत्यंत तज्ञ आणि आर्थिक गुंतवणूक सल्ला आणि मार्गदर्शन क्षेत्रातील प्रख्यात साधन व्यक्तींनी अत्यंत सखोल असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य आणि उद्घाटन सत्राचे उद्घाटक मा. श्री. दिनेश चव्हाण यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी केले. तसेच एच आर वायकोळे इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन चे संचालक प्रा डॉ निखिल वायकोळे यांचे स्वागत ही प्राचार्य डॉ आर पी फालक यांचे हस्ते करण्यात आले. तर प्राचार्य डॉ आर पी फालक यांचे स्वागत महाविद्यालयाच्या आयोजन समितीचे प्रमुख प्रा. डॉ संजय चौधरी यांनी, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी च्या अध्यक्षा सौ सीमा सोनार यांचे स्वागत प्रा. श्रेया चौधरी आणि सचिव सौ योगिता वायकोळे यांचे स्वागत प्रा संगीता धर्माधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी च्या संचालक मंडळाच्या सदस्या, शहरातील महिला वर्ग यांचे सह दादासाहेब भोळे महाविद्यालय,भुसावळ, कोटेचा महिला महाविद्यालय, नाहाटा महाविद्यालय आणि काल वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, यावल येथील सुमारे दीडशे महिला आणि युवती उपस्थित होत्या.
महाविद्यालयातील आयोजन समितीच्या माध्यमातून …. यांनी कार्यशाळेसाठी सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.