श्रीपंचकृष्ण समाज प्रबोधन तीर्थस्थान दर्शन पदयात्रेचे भुसावळात आगमन

भुसावळ (प्रतिनिधी ) : ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ अमरावती आयोजित श्रीपंचकृष्ण समाज प्रबोधन तीर्थस्थान दर्शन पदयात्रेचे बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी भुसावळ नगरीत आगमन झाले. श्रद्धानगर येथील महानुभाव आश्रमातून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरातील काशीनाथ लॉज परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी स्वागतासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

सुमारे ४०० हून अधिक भाविकांच्या सहभागाने जयघोष आणि भक्तिमय वातावरणात पदयात्रा पुढे सरकली. काशीनाथ लॉजपासून सुरू झालेली ही पदयात्रा म्युन्सीपल पार्क येथील श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. पदयात्रेचे नेतृत्व बैरागी बाबा पंजाबी यांनी केले.

श्रीकृष्ण मंदिर आराध्य प्रतिष्ठान तर्फे पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी समाज प्रबोधन, नैतिक मूल्यांची जपणूक आणि अध्यात्मिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. पदयात्रेमुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.