भुसावळ((प्रतिनिधी)-शहरातील तापी नदीवरील पुलावरून एका तरुणाने उडी घेतल्याची धक्कादायक घटना आज बुधवार रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

हर्षल सोनार (वय ३२, रा.काजी प्लॉट भुसावळ ) असे उडी घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल सोनार हे पत्नी व मुलासह वास्तव्यास होते. दुपारच्या सुमारास त्यांनी अचानक पुलावरून नदीत उडी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटना लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू असून अद्याप संबंधित तरुणाचा उडी घेण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून कुटुंबीय व मित्रपरिवाराकडून अधिक माहिती घेतली जात असून तपास सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पुलाजवळ गर्दी करू नये व बचावकार्याला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


