यावल – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढोदे प्र. यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युगप्रवर्तक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवरायांची जयंती विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरी केली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. मुख्याध्यापिका सौ. वैशाली दिनेश पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
यानंतर विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे सादर केली. स्वराज्य स्थापनेचा इतिहास, शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रप्रेम या गुणांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांना प्रेरित केले.
शिवजयंतीचे औचित्य साधून शाळेच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर असणारे उपशिक्षक श्री. सचिन महादेव धालपे व उपशिक्षिका सौ. प्रमिला सचिन धालपे यांनी शाळेला डायस भेट दिला. त्यांच्या या उदार देणगीमुळे शाळेतील विविध कार्यक्रम अधिक सुबक आणि व्यवस्थितपणे पार पाडणे सुलभ होणार आहे.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ. वैशाली पाटील यांनी धालपे दांपत्यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांचा यथोचित सत्कार केला तसेच त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व इतिहासाबद्दल अभिमानाची भावना जागृत झाल्याचे दिसून आले.



