भुसावळ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) अंतर्गत दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिर (RDC) मधील पंतप्रधान रॅलीसाठी निवड झालेल्या महाविद्यालयातील कॅडेट्सचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

महाविद्यालयातील जे.यू.ओ. समीक्षा पवार (आर.डी.सी. गोल्डन) आणि जे.यू.ओ. तेजस वाघोदे यांनी भुसावळ ते दिल्ली असा खडतर आणि स्पर्धात्मक प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करत विविध एनसीसी शिबिरांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. अंतिम फेरीत त्यांची पंतप्रधान रॅलीसाठी निवड होऊन महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.
समीक्षा पवार यांनी महाराष्ट्र ट्रूपच्या कंटिंजंट कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळत नेतृत्वगुणांची छाप पाडली आणि महाविद्यालयाचा गौरव वाढविला. तर तेजस वाघोदे यांनीही पंतप्रधान रॅलीत सहभाग नोंदवत महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले. विशेष म्हणजे तब्बल ११ वर्षांनंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा मान मिळाला आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एच. बाऱ्हाटे यांच्या हस्ते दोन्ही कॅडेट्सचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ. जी.आर. वाणी, उपप्राचार्य लेफ्टनंट डॉ. डी.एन. पाटील, एनसीसी सीटीओ प्रा. स्मिता बेंडाळे तसेच कार्यालय अधीक्षक श्री. भगवान तायडे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.


