फैजपूर (प्रतिनिधी )– शहरातील हुतात्मा बापू वाणी चौकात शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकाची अज्ञात व्यक्तीने फाडफाड करून विटंबना केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास येताच शिवजयंती महोत्सव समिती व नागरिकांनी तातडीने पोलीस प्रशासनाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने चौकात जमले आणि निषेध व्यक्त करत तब्बल पाच तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
पोलीस प्रशासनाकडून आठ दिवसांच्या आत दोषींना अटक करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
आंदोलनाचा समारोप शिवआरती, माल्यार्पण व जलाभिषेक करून करण्यात आला. दोषींवर कडक कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, फैजपूर शहरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावाचे वातावरण कायम आहे. पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला असून संबंधितांना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


