मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलमध्ये सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी दुपारी परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिंदे शिवसेना पक्षाचे राज्यस्तरीय प्रदेशाध्यक्ष अफसर खान याच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परीक्षा केंद्राचे संचालक तथा अंतुर्ली येथील तराळ विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रामकृष्ण बाऊस्कर (वय ५८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर सुरू असताना दुपारी सुमारे साडेबारा वाजता एका व्यक्तीने मुख्य प्रवेशद्वारातून केंद्रात अनधिकृत प्रवेश केला. संबंधित व्यक्ती सुमारे एक ते दीड तास मोबाईलवर संभाषण करत होती. त्यानंतर तो केंद्राबाहेर निघून गेला.
दरम्यान, केंद्र परिसरात तोडफोड झाल्याची नोंद करण्यात आली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवला. परीक्षा प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
या घटनेमुळे परीक्षा केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास सुरू आहे.


