जुहू कोळीवाडा चौपाटीवर शिर नसलेल्या पुरुषाचा मृतदेह आढळला; पत्नी चौकशीसाठी ताब्यात

मुंबई ( प्रतिनिधी ) –

मुंबईतील जुहू कोळीवाडा चौपाटी परिसरात शिर नसलेल्या एका पुरुषाचा छिन्नविछिन्न व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृताची ओळख पटवली असून, या प्रकरणी त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुहू कोळीवाडा समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात एका संशयास्पद पोत्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोते उघडून पाहिले असता, त्यामध्ये एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शिर नसल्याने सुरुवातीला ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या.

तांत्रिक तपास तसेच बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर मृत व्यक्तीची ओळख अनिल गौड (वय 30) अशी पटली. अनिल गौड हा 29 जानेवारीपासून बेपत्ता होता आणि त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मृतदेह गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पोत्यात असल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि कलम 238 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात संशय बळावल्याने अनिल गौड याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडला की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, मृतदेहाचे शिर अद्याप सापडले नसून, त्याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.