विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा : मुक्ताईनगरातील जे. ई. स्कूलमधील समारंभात डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम :

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा केवळ करमणुकीचे साधन न राहता शिक्षण, माहिती, संवाद आणि करिअर मार्गदर्शनाचे प्रभावी माध्यम बनला आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर स्वतःच्या शिक्षणासाठी, कौशल्यविकासासाठी व सकारात्मक संवादासाठी करावा. अभ्यासाशी संबंधित माहिती, स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन, प्रेरणादायी विचार यासाठी सोशल मीडियाचा उपयोग केल्यास तो निश्चितच उपयुक्त ठरतो. तंत्रज्ञानासह सोशल मीडिया हे आजच्या युगातील प्रभावी माध्यम असले तरी त्याचा वापर शहाणपणाने करावा, असे आवाहन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. एकनाथराव खडसे तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, संस्थेचे चेअरमन ऍड. रोहिणी खडसे, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, संचालक पुरूषोत्तम महाजन, महेश पाटील, रमेश खाचणे, प्राचार्य विकास चौधरी, सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्षा योगिता पाटील, मुख्याध्यापक आर. वाय. सोनवणे, मुख्याध्यापिका चित्रा भारंबे उपस्थित होते. डॉ. जगदीश पाटील यांचा परिचय एस. आर. ठाकूर यांनी करून दिला. प्रास्ताविकात प्राचार्य विकास चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. देवश्री विकास पाटील हिने आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीत इस्ट अँड वेस्ट, जेई स्कूल इज द बेस्ट यावर मनोगत व्यक्त केले.

प्रमुख वक्ते डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, संवादाची सुरूवात ऐकण्यापासून होते. नीट ऐकून घेतल्यानंतर स्पष्ट, योग्य शब्दांत व्यक्त होता आले पाहिजे. भावनांवर नियंत्रण ठेवून, नियोजनबद्ध पद्धतीने संवाद साधण्याची क्षमता आवश्यक आहे. यासाठी वाचनाची सवय लावणे आणि शब्दसंपत्ती वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी श्रवण, वाचन, लेखन या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून सर्वांगीण विकास साधावा, तसेच ताणतणावाचे नियोजन कसे करावे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्थक, एनसीसी बेस्ट कॅडेट, आदर्श विद्यार्थी तसेच विविध स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. शाळेच्या झेप हस्तलिखिताचे प्रकाशन ऍड. रोहिणीताई खडसे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध उपक्रमात योगदान दिल्याबद्दल उपशिक्षक शिवाजीराव वंजारी यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. आ. एकनाथराव खडसे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. कलाशिक्षिका अर्चना भोळे भगवान बुद्ध यांची कलाकृती साकारली ठरली. यशस्वीतेसाठी प्राचार्य विकास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आर. व्ही. महाजन व आर. डी. भोळे यांनी केले.

फोटो ओळी – दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करताना डॉ. जगदीश पाटील सोबत डॉ. सी. एस. चौधरी, रमेश खाचणे, प्राचार्य विकास चौधरी आदी.