भुसावळ
रावेर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी ७, रोजी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे, जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे तसेच रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रावेर मतदारसंघांतर्गत जामनेर–पाचोरा–बोदवड वाढीव रेल्वे लाईन तसेच भुसावळ–खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन या प्रकल्पांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या कामांमुळे अनेक शेतकरी बाधित झाले असून, त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. विशेषतः बोदवड व भुसावळ तालुक्यांतील तसेच वरणगाव परिसरातील रेल्वे रुळालगत असलेल्या शेतकऱ्यांसाठी रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB) व अंडर ब्रिज (RUB) उभारणी, शेतात जाण्यासाठी रस्त्यांची सुविधा तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांना विकासकामांमुळे कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन व रेल्वे विभागाने समन्वयाने काम करावे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.




