भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने रेल्वेच्या मालमत्तेचा व्यावसायिक वापर, नवीन व्यावसायिक सुविधा सुरू करणे आणि पारदर्शक स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून भाडे व्यतिरिक्त महसूल (Non-Fare Revenue – NFR) वाढविण्याच्या प्रयत्नांना गती दिली आहे. या उपक्रमांमुळे उत्साहवर्धक आर्थिक लाभ मिळत असून, अनेक व्यावसायिक कंत्राटे राखीव किमतीपेक्षा लक्षणीय अधिक परवाना शुल्कावर प्रदान करण्यात आली आहेत. आर्थिक वर्ष २०२६–२७ मध्ये आतापर्यंत विभागाने विविध रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे आस्थापनांमध्ये एकूण १० व्यावसायिक कंत्राटे प्रदान केली आहेत. यामधून वार्षिक सुमारे ₹१२.३३ लाख परवाना शुल्क मिळणार असून, संबंधित कंत्राटांच्या संपूर्ण कालावधीतील एकत्रित करारमूल्य सुमारे ₹६४.०६ लाख आहे. नेपानगर स्थानकावर प्रथमच सर्व मालमत्तांचा समूह करार भुसावळ विभागाची एक महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणजे नेपानगर स्थानकावर दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी प्रथमच सर्व मालमत्तांचा समूह करार (All-Assets Cluster Contract) प्रदान करण्यात आला. पाच वर्षांच्या या कंत्राटासाठी वार्षिक ₹५०,००० राखीव किमतीच्या तुलनेत ₹२.२१ लाख परवाना शुल्क निश्चित झाले आहे. हे शुल्क राखीव किमतीपेक्षा ३४२ टक्क्यांनी अधिक आहे. या समूहामध्ये जाहिरात फलक, खाद्यपदार्थ विक्रीसाठी किऑस्क असलेली विनामूल्य वातानुकूलनरहित प्रतीक्षागृह सुविधा, किराणा किऑस्क आणि दुचाकी वाहनतळ यांचा समावेश आहे. यापूर्वी बिगर भाडे महसूल प्राप्त न होणाऱ्या या स्थानकावरून आता महसूल मिळण्याचा नवीन स्रोत निर्माण झाला आहे. तसेच, रेल्वेच्या उपलब्ध मालमत्तेचा अधिक प्रभावी व्यावसायिक वापर शक्य झाला आहे. जाहिरात फलकांद्वारे महसूलवृद्धी दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी लासलगाव आणि निफाड स्थानकांवरील जाहिरात फलकांच्या माध्यमांशी संबंधित कंत्राटे प्रदान करण्यात आली. लासलगाव स्थानकावरील कंत्राटासाठी ₹३८,०९१ वार्षिक राखीव किमतीच्या तुलनेत ₹४०,००० वार्षिक परवाना शुल्क निश्चित झाले आहे. निफाड स्थानकावरील कंत्राटासाठी ₹३४,२८२ वार्षिक राखीव किमतीच्या तुलनेत ₹८१,००० वार्षिक परवाना शुल्क प्राप्त झाले असून, हे शुल्क राखीव किमतीपेक्षा १३६ टक्क्यांनी अधिक आहे. या दोन्ही कंत्राटांचे तीन वर्षांच्या कालावधीतील एकत्रित करारमूल्य अनुक्रमे ₹१.२० लाख आणि ₹२.४३ लाख आहे. किराणा किऑस्क सुविधांचा विस्तार दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी बुऱ्हाणपूर आणि खंडवा स्थानकांवर किराणा किऑस्क चालविण्याची कंत्राटे प्रदान करण्यात आली. बुऱ्हाणपूर स्थानकावरील कंत्राटासाठी ₹५०,००० वार्षिक राखीव किमतीच्या तुलनेत ₹५०,५०० परवाना शुल्क निश्चित झाले आहे. खंडवा स्थानकावरील कंत्राटासाठी ₹१,५२,३०३ वार्षिक राखीव किमतीच्या तुलनेत ₹१.६१ लाख वार्षिक परवाना शुल्क प्राप्त झाले आहे. या कंत्राटांचे पाच वर्षांच्या कालावधीतील एकत्रित करारमूल्य अनुक्रमे सुमारे ₹२.६८ लाख आणि ₹८.५४ लाख आहे. या सुविधांमुळे स्थानक परिसरातील मालमत्तेचा व्यावसायिक वापर वाढण्यासोबतच रेल्वे प्रवाशांना दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. *रेल्वे आस्थापनांमध्ये उपाहारगृह सुविधा* दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन महत्त्वाच्या रेल्वे आस्थापनांमध्ये उपाहारगृह (कॅन्टीन) सुविधांसाठी कंत्राटे प्रदान करण्यात आली. इलेक्ट्रिक लोको शेड (MOH) येथील कंत्राटासाठी ₹५०,००० वार्षिक राखीव किमतीच्या तुलनेत ₹२.८८ लाख वार्षिक परवाना शुल्क निश्चित झाले आहे. हे शुल्क राखीव किमतीपेक्षा ४७६ टक्क्यांनी अधिक आहे. कोचिंग यार्ड (LOCO) येथील कंत्राटासाठी ₹५०,००० वार्षिक राखीव किमतीच्या तुलनेत ₹१.३१ लाख वार्षिक परवाना शुल्क प्राप्त झाले असून, हे शुल्क राखीव किमतीपेक्षा १६३ टक्क्यांनी अधिक आहे. या कंत्राटांचे पाच वर्षांच्या कालावधीतील एकत्रित करारमूल्य अनुक्रमे सुमारे ₹१५.२९ लाख आणि ₹७.०१ लाख आहे. या सुविधांमुळे रेल्वे कर्मचारी आणि इतर पात्र व्यक्तींना खाद्यपदार्थ व अल्पोपाहार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. *तीन स्थानकांवर औषध विक्री केंद्रांच्या सुविधा* प्रवाशांना अत्यावश्यक औषधे आणि वैद्यकीय उत्पादने सहज उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ, बडनेरा आणि चाळीसगाव स्थानकांवर औषध विक्री केंद्रांसाठी कंत्राटे प्रदान करण्यात आली. भुसावळ स्थानकावरील कंत्राटासाठी ₹६०,००० वार्षिक राखीव किमतीच्या तुलनेत ₹१.९० लाख वार्षिक परवाना शुल्क निश्चित झाले आहे. हे शुल्क राखीव किमतीपेक्षा २१८ टक्क्यांनी अधिक आहे. बडनेरा स्थानकावरील कंत्राटासाठी ₹३०,००० वार्षिक राखीव किमतीच्या तुलनेत ₹५१,०२१ वार्षिक परवाना शुल्क, तर चाळीसगाव स्थानकावरील कंत्राटासाठी ₹२५,००० वार्षिक राखीव किमतीच्या तुलनेत ₹३८,९९९ वार्षिक परवाना शुल्क प्राप्त झाले आहे. या तिन्ही कंत्राटांचे पाच वर्षांच्या कालावधीतील एकत्रित करारमूल्य अनुक्रमे सुमारे ₹१०.१४ लाख, ₹२.७० लाख आणि ₹२.०७ लाख आहे. *आर्थिक लाभ आणि रेल्वे मालमत्तेचा अधिक प्रभावी वापर* या कंत्राटांमधून भुसावळ विभागाने महसुलाच्या नवीन संधी शोधण्यावर आणि रेल्वेच्या मालमत्तेच्या व्यावसायिक क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यावर दिलेला भर स्पष्ट होतो. स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेमुळे अनेक ठिकाणी राखीव किमतीपेक्षा लक्षणीय अधिक परवाना शुल्क मिळाले असून, विभागाच्या नियमित महसुलात वाढ होण्यास मदत होत आहे. या उपक्रमांमुळे प्रवासी सुविधांचा विकास, अत्यावश्यक वस्तू व सेवांची उपलब्धता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचा विस्तार यांनाही चालना मिळत आहे. नेपानगर स्थानकावर राबविण्यात आलेले सर्व मालमत्तांचा समूह कराराचे प्रारूप हे यापूर्वी बिगर भाडे महसुलासाठी वापरात नसलेल्या मालमत्तांमधून उत्पन्न निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पारदर्शक निविदा प्रक्रिया, नाविन्यपूर्ण व्यावसायिक नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग आर्थिक वर्ष २०२६–२७ मध्ये भाडे व्यतिरिक्त महसूल वाढविणे, रेल्वे मालमत्तेची उत्पादकता सुधारणे आणि शाश्वत महसूलवाढ साध्य करण्याच्या दिशेने सातत्याने कार्यरत आहे.


