मालेगाव (7 फेब्रुवारी 2026) –
मालेगाव महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच एक मोठी दुर्घटना घडण्यापासून थोडक्यात बचाव झाला. महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून 18 प्रवाशांसह लिफ्ट अचानक खाली कोसळली. सुदैवाने ही लिफ्ट तळमजल्यापर्यंत न जाता पहिल्या मजल्यावर अडकली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
शनिवारी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा उत्साह असतानाच ही घटना घडली. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच 18 नागरिक असल्याने तसेच लिफ्टची चैन तुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. चौथ्या मजल्यावरून वेगाने खाली येत असताना लिफ्ट पहिल्या मजल्यावर अडकली.
लिफ्ट कोसळल्याचा मोठा आवाज आणि आत अडकलेल्या नागरिकांच्या ओरडण्यामुळे महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
लिफ्ट अशा स्थितीत अडकली होती की दरवाजा उघडणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. अखेर बचाव पथकाने पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून विशेष प्रयत्नाने लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्व 18 नागरिकांची सुखरूप सुटका केली.
या लिफ्टमध्ये ‘इस्लाम पार्टी’चे नेते आसिफ शेख, मुश्तकिन डिग्निटी, काही नवनियुक्त नगरसेवक तसेच पाच पत्रकारांचा समावेश होता. सर्वांची सुरक्षित सुटका झाल्यानंतर प्रशासन, राजकीय नेते आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
लिफ्ट थेट आदळली असती, तर स्फोट होण्याचीही शक्यता होती, मात्र सुदैवाने तसे घडले नाही. या लिफ्टची योग्य देखभाल व डागडुजी न झाल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.



