मध्य रेल्वेच्या १२ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांकडून संरक्षा पुरस्कार प्रदान

मध्य रेल्वेच्या विविध विभागांतील कर्तव्यनिष्ठ व सतर्क अशा १२ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांच्या हस्ते संरक्षा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आयोजित करण्यात आला.
कर्तव्य बजावत असताना या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान, सतर्कता आणि त्वरित कृतीमुळे संभाव्य गंभीर रेल्वे अपघात टळले असून सुरक्षित रेल्वे संचालन सुनिश्चित झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाच्या मान्यतेस्वरूप प्रत्येक पुरस्कारामध्ये पदक, प्रशस्तीपत्र आणि रुपये ३,५००/- रोख पारितोषिक देण्यात आले.
मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागांतील या कर्मचाऱ्यांनी प्रवासी सुरक्षितता, ट्रॅक संरक्षा, गाडी तपासणी व आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ निर्णय घेऊन अनेक जीव वाचवले. उपनगरी व मालगाड्यांतील तांत्रिक बिघाड, रुळांवरील तडे, सपाट चाके, धूर व ठिणग्या यांसारख्या धोकादायक बाबी वेळेत लक्षात घेऊन त्यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क केले.
महाव्यवस्थापक श्री प्रतीक गोस्वामी यांनी पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यामुळे इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनाही अधिक सतर्क राहून प्रवाशांची सुरक्षितता व रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी श्री चंद्रकिशोर प्रसाद यांच्यासह मध्य रेल्वेचे प्रधान विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचा तपशील:

मुंबई विभाग

श्री लक्ष्मण रघुनाथ जाखरे, कॉंटेवाला, आटगाव, मुंबई विभाग यांनी ०२.०१.२०२६ रोजी कर्तव्यावर असताना एका प्रवाशाला उपनगरी गाडीत चढताना प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या दरम्यान पडताना पाहिले. त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्या प्रवाशाला संभाव्य गंभीर अपघातापासून वाचवले. त्यांच्या सतर्कता आणि त्वरित कृतीमुळे अनुचित घटना टळली.

श्री पंढरीनाथ सोमा नाडेकर, ट्रेन व्यवस्थापक, कल्याण, मुंबई विभाग यांनी ०८.०१.२०२६ रोजी कर्तव्यावर असताना MUCK विशेष गाडीतून धूर निघताना आढळला. त्यांनी तात्काळ संबंधित सर्वांना माहिती दिली व वेळेत आवश्यक कार्यवाही करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर घटना टळली.

श्री रणजीत कुमार यादव, हेल्पर (एस अँड टी), ठाणे, मुंबई विभाग यांनी ०८.०१.२०२६ रोजी नियमित तपासणीदरम्यान कि.मी. ३१/५१५ येथे रेल्वे रुळाला तडा गेलेला आढळला. त्यांनी तात्काळ संबंधित सर्वांना माहिती देऊन दुरुस्तीची खात्री केली व संभाव्य अपघात टाळला.

नागपूर विभाग

श्री अनुराग श्रीवास्तव, सहाय्यक कॉंटेवाला, तडाली, नागपूर विभाग यांनी ०८.१२.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना धावत्या मालगाडीतून ईएम पॅडमधून ठिणग्या निघताना दिसल्या. त्यांनी तात्काळ गाडी थांबवून संबंधित सर्वांना माहिती दिली, त्यामुळे संभाव्य अपघात टळला.

श्री प्रदीप निर्मळ, हेल्पर (एस अँड टी), आमला, नागपूर विभाग यांनी ०२.०१.२०२६ रोजी कर्तव्यावर असताना पॉइंट क्रमांक १३९/बी च्या टंग रूळामध्ये नुकसान आढळले. त्यांनी त्वरित संबंधितांना माहिती दिली व वेळेत करण्यात आलेल्या कार्यवाहीमुळे संभाव्य अपघात टळला.

श्री उमेश मौर्य, लोको पायलट (शंटर), घुग्घुस, नागपूर विभाग यांनी १६.१२.२०२५ रोजी शंटिंग कार्यादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेलेला आढळला. त्यांनी तात्काळ संबंधित सर्वांना माहिती दिली, त्यामुळे संभाव्य अपघात टळण्यास मदत झाली.

भुसावळ विभाग

श्री फुल कुमार गौतम, लोको पायलट (गुड्स), भुसावळ यांनी १९.०१.२०२६ रोजी गाडी क्रमांक १२४०६ वर कर्तव्यावर असताना कि.मी. ७७४/११–१९ दरम्यान ट्रॅक मेंटेनरला रुळांवर काम करताना दिसला. त्यांनी त्याला सतर्क करण्यासाठी शिटी दिली; मात्र ट्रॅक मेंटेनर रुळांवरून दूर न गेल्यामुळे त्यांनी तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबवली. त्यांच्या सतर्कता व त्वरित कृतीमुळे ट्रॅक मेंटेनरचे प्राण वाचले.

श्री राहुल चंदा, एमएसएम (कॅरेज अँड वॅगन), भुसावळ यांनी ०९.०१.२०२६ रोजी कर्तव्यावर असताना मालगाडीच्या तपासणीदरम्यान एका डब्याच्या बोगी बोल्स्टरमध्ये दोष आढळला. त्यांनी तात्काळ संबंधित सर्वांना माहिती दिली व संभाव्य अपघात टाळला.

श्री विजय सुरडकर, कॉन्स्टेबल (आरपीएफ), जळगाव, भुसावळ विभाग यांना ०२.१२.२०२५ रोजी जळगाव स्थानकावर कर्तव्यावर असताना गाडी क्रमांक 12112 मध्ये चढताना एक प्रवासी पडताना दिसला. त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्या प्रवाशाला गंभीर दुखापतीपासून वाचवले. त्यांच्या प्रसंगावधान आणि त्वरित कृतीमुळे अनुचित घटना टळली.

सोलापूर विभाग

श्री उमेश रमेश बदर, कनिष्ठ अभियंता (टीआरडी), कुर्डुवाडी, सोलापूर विभाग यांना ०३.११.२०२५ रोजी पायी गस्तीदरम्यान कि.मी. ३७३/०८ येथे जी जंपर तुटलेला आढळला. त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना माहिती देऊन ट्रॅकची संरक्षा सुनिश्चित केले व संभाव्य अपघात टाळला.

श्री भानुदास एन. शेळके, ट्रॅक मेंटेनर, अरग, सोलापूर विभाग यांना ३०.१२.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना धावत्या मालगाडीच्या एका डब्याचे चाक सपाट (फ्लॅट टायर) झाल्याचे आढळले. त्यांनी तात्काळ संबंधितांना माहिती दिली व वेळेत करण्यात आलेल्या कार्यवाहीमुळे संभाव्य अपघात टळला.

पुणे विभाग

श्री कंचन कुमार, वरिष्ठ विभाग अभियंता (पी.वे), सांगली, पुणे विभाग यांना १४.०१.२०२६ रोजी तपासणीदरम्यान मालगाडीच्या एका डब्याचे चाक सपाट (फ्लॅट टायर) झाल्याचे आढळले. त्यांनी तात्काळ संबंधित सर्वांना माहिती दिली व संभाव्य अपघात टाळला.