भुसावळ ( प्रतिनिधी ) –
भुसावळ नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. या पहिल्याच सभेत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली असली तरी काही महत्त्वाच्या विषयांवरून सभागृहात तीव्र चर्चा व वाद झाले. विशेषतः प्रभाग क्रमांक २ मधील कामांबाबत मांडण्यात आलेल्या विषयांमुळे सभेचे वातावरण चांगलेच तापले होते.
सभेदरम्यान प्रभाग क्रमांक २ मधील पाणीपुरवठा योजनेशी संबंधित पाईपलाइन टाकण्याच्या विषयावरून वाद निर्माण झाला. या वादामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण होते. ज्येष्ठ नगरसेवक संतोष चौधरी यांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती शांत झाली.
विषय क्रमांक १ अंतर्गत कब्रस्तानला लाकडे व गौऱ्या पुरवण्यास मंजुरी देण्याबाबत भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी लक्षवेधी सूचना मांडली. यापूर्वी लेखापरीक्षकांनी या विषयावर आक्षेप नोंदवले असल्याने काळजीपूर्वक निर्णय घ्यावा, असे त्यांनी सूचित केले.
दरम्यान, विषय क्रमांक २२ नुसार उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी नदीपात्रातून ‘पाणबुडी’द्वारे पाणी उचलून जॅकवेलमध्ये नेण्याच्या प्रस्तावावर अधिकाऱ्यांना ‘पाणबुडी’ या संकल्पनेबाबत समाधानकारक माहिती देता आली नाही. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. प्रशासकीय भाषेत ‘पाणबुडी’ म्हणजे नेमके काय, याचे उत्तर अधिकारी देऊ शकले नाहीत.

लाडका नगरसेवक योजना राबवली जाणार का ? सवाल उपस्थित….
याच विषयाच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक २ साठी तब्बल ४२ विषय मंजुरीसाठी मांडण्यात आल्यावर भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी आक्षेप घेत ‘लाडका नगरसेवक योजना’ राबवली जात आहे का, असा सवाल उपस्थित केला. यावर नगरसेवक सचिन पाटील यांनी आक्षेप घेतल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. इतर नगरसेवकही वादात सहभागी झाल्याने काही काळ सभेचे कामकाज स्थगित करावे लागले.

उर्वरित विषयांबाबत भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी विवेक धांडे यांना लेखी पत्र देत मंजुरी अथवा नामंजुरीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, भुसावळ शहरातील सिटी सर्वे नं. १६१ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलाच्या दुरुस्तीबाबत तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ६० गाळे आरक्षित ठेवून उर्वरित गाळ्यांच्या रक्षण प्रक्रियेबाबत भाजप नगरसेवकांनी ‘ॲक्शन’ घेत विरोध दर्शवला. यापूर्वी असलेल्या ५७ गाळेधारकांना न्याय देण्याची मागणी गटनेते युवराज लोणारी यांनी केली.
आयत्या वेळच्या विषयाद्वारे सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोटो सभागृहात लावण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
तसेच नगरसेवक किरण कोलते यांनी जामनेर रोडवरील दिनदयाल नगर ते राजपूत चाट दरम्यान स्ट्रीट लाईट बंद असल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला. संबंधित अधिकारी मनोज मोरे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
या सभेला नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, ज्येष्ठ नगरसेवक संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे गटनेते सचिन चौधरी, भाजपचे गटनेते युवराज लोणारी, मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


