भुसावळात महाराष्ट्ररत्न गुणगौरव पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा : शिक्षण-समाज-संस्कृती क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा राज्यस्तरीय सन्मान :

भुसावळ (प्रतिनिधी) :
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भुसावळ येथील अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्ररत्न गुणगौरव पुरस्कार’ प्रदान करून भव्य समारंभात गौरविण्यात आले.

राज्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या समाजहितैषी घटकांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे दरवर्षी हा मानाचा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाही राज्यभरातून निवड करण्यात आलेल्या अनेक मान्यवरांना संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई इंगळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात ज्युनिअर कलाकार मकरंद अनासपुरे यांच्या विनोदी मिमिक्रीने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. तसेच लावणी सम्राज्ञा गौतमी पाटील शो मधील दोन्ही नृत्यांगनांच्या बहारदार नृत्यप्रस्तुतीने कार्यक्रमाला रंगत आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश लोडते यांनी प्रभावी व ओघवत्या शैलीत करीत सिनेगीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

या वेळी भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र अहिरे, नगरसेवक (प्रतोद) उल्हासभाऊ पगारे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहायक वर्षाताई लोखंडे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दामोदर राजपूत, बचतगट समन्वयिका सौ. अलका शिरसाट, सौ वंदना जोगदंड , यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.