म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती उत्साहात साजरी


भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी राजू समशेर उपस्थित होते. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका एस. एन. बनसोडे यांच्या हस्ते संत गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर माजी विद्यार्थी राजू समशेर व मुख्याध्यापक सुभाष मेढे यांनीही प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी राजू समशेर यांनी संत रविदास महाराज यांच्या विविध दोह्यांच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्यावर प्रकाश टाकला. तसेच एस. टी. चौधरी यांनी आपल्या मनोगतातून संत रविदास महाराज यांच्या विचारधारेचे महत्त्व विशद केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एस. जी. मेढे यांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेत समाजात समता, बंधुता व मानवतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन एन. एच. राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.