अट्रावलच्या मुंजोबा यात्रेत महिलांच्या मंगळसूत्रांची चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

यावल – तालुक्यातील अट्रावल परिसरात 31 जानेवारी 2026 रोजी भरलेल्या प्रसिद्ध मुंजोबा यात्रेत महिलांच्या मंगळसूत्रांची धक्कादायक चोरी समोर आली आहे. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एकाच वेळी पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे आणि पोत लंपास केली.

फिर्यादी मंदाकिनी मुकेश गजरे त्यांच्या सोबत असलेल्या राखी सुरवाडे, रूपाली कोळी, रोहिणी जाधव आणि स्वाती वराडे यांच्यासह यात्रेस उपस्थित होत्या. या चोरीत एकूण सुमारे 56 हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल गहाळ झाला आहे.

घटनेनंतर यात्रेतील भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र बागुल तपास करत आहेत.