मुक्ताईनगर तालुक्यात भुसावळ जिल्हा महिला समितीचा नारी शक्ती दिवस व हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा

भुसावळ (प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हाकाकोडा क्षेत्रातील राजुरा वस्ती येथे दिनांक २५ जानेवारी रोजी देवगिरी कल्याण आश्रमच्या भुसावळ जिल्हा महिला समितीच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांना तिळगुळ वाण व ब्लाऊजपीस देण्यात आले. तसेच राणी माँ गाईदिन्ल्यु यांच्या जयंतीनिमित्त नारी शक्ती दिवस साजरा करण्यात आला. राणी माँ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात पाड्यावरील महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यावेळी ॲड. जास्वंदी भंडारी यांनी राणी माँ गाईदिन्ल्यु यांच्या सामाजिक व प्रेरणादायी कार्याची माहिती दिली. तसेच वस्तीवर उपलब्ध असलेल्या सुविधा, भविष्यात करता येणारी विकासकामे आणि विविध शासकीय कागदपत्रांची पूर्तता कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान लहान मुलांना पतंग व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजुर वस्तीपासून सुमारे २१ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचखेडी वस्तीला भेट दिली. तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच या वस्तीवर कोणती कामे करता येतील व कशा प्रकारे मदत करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या दौऱ्यात भुसावळ जिल्हा अध्यक्ष डॉ. निलेश भिरुड, जिल्हा महिला प्रमुख ॲड. जास्वंदी भंडारी, जिल्हा महिला सहप्रमुख ॲड. चित्रा आचार्य, जिल्हा शिक्षण आयाम प्रमुख ॲड. मंजुषा कुलकर्णी, जिल्हा सहकोषाध्यक्ष जयश्री देशमुख, भुसावळ तालुका महिला पत्रकार उज्वला बागुल, नंदाताई पाटील तसेच पूर्णकालीन कार्यकर्ता वीरसिंग वसावे यांची उपस्थिती होती.

भुसावळ येथून ये-जा करत हा संपूर्ण प्रवास जवळपास १८० किलोमीटरचा असूनही समितीच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी वस्तीवरील बंधू-भगिनींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.