भुसावळ (| प्रतिनिधी)- सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून अनेक प्रवाशांना तिकिटांच्या अभावामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ–मिरज आणि अमरावती–पनवेल या मार्गांवर दोन अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना या विशेष गाड्यांचा मोठा फायदा होणार असून सण आणि सुट्ट्यांच्या काळात अमरावती, अकोला, जळगाव, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
भुसावळ मिरज विशेष रेल्वे
०१२०९ क्रमांकाची भुसावळ–मिरज विशेष गाडी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ४.५० वाजता भुसावळ येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता मिरज येथे पोहोचेल.
परतीची ०१२१० क्रमांकाची मिरज–भुसावळ गाडी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मिरज येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता भुसावळ येथे पोहोचेल.
या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी आणि सांगली येथे थांबे देण्यात आले आहेत.
अमरावती–पनवेल विशेष रेल्वे
०१४१६ क्रमांकाची अमरावती–पनवेल विशेष गाडी २२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता अमरावती येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेल येथे पोहोचेल.
तर ०१४१५ क्रमांकाची पनवेल–अमरावती परतीची गाडी २६ जानेवारी रोजी रात्री ७.५० वाजता पनवेल येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता अमरावती येथे पोहोचेल.
या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा आणि कर्जत येथे थांबे असतील.
या विशेष रेल्वेमुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


