कासोदा (प्रतिनिधी) – पत्नीच्या ऑपरेशनसाठी गुजरात राज्यातील नवसारी येथे गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, देवघरातील चांदीचे देव व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना कासोदा येथील रामनगर भागात घडली.

रामनगर येथे वास्तव्यास असलेले रमणलाल नथ्थु सोनार हे आपल्या पत्नीसोबत १५ जानेवारी रोजी ऑपरेशनसाठी नवसारी येथे गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील दोन्ही बेडरूममधील लोखंडी कपाटे उघडून त्यातील सोन्याचे दागिने, देवघरातील चांदीचे देव, १० ग्रॅम सोन्याची पोत व ७० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
ही बाब २१ जानेवारी रोजी दुपारी रमणलाल सोनार घरी परतल्यानंतर उघडकीस आली. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांसोबत ठेवलेले नकली (बेटेक्स) दागिने चोरट्यांनी घरातच फेकून दिल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रमणलाल सोनार यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राकेश खोंडे, योगेश पाटील व नरेंद्र पाटील करीत आहेत. तसेच घटनास्थळी फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते.


