२६ जानेवारीच्या ध्वजारोहणावरून भुसावळ नगरपरिषदेत राजकीय वाद : परंपरा मोडल्याचा भाजप गटनेते युवराज लोणारी यांचा नगराध्यक्षांवर आरोप

भुसावळ ( प्रतिनिधी ) –

देशाचा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना भुसावळ नगरपरिषदेत मात्र ध्वजारोहणाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. नगरपरिषदेतील गेल्या सुमारे ५० वर्षांपासून सुरू असलेली ध्वजारोहणाची परंपरा मोडीत काढल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे गटनेते व नगरसेवक युवराज दगडू लोणारी यांनी नगराध्यक्ष सौ. गायत्री भंगाळे / गौर यांच्यावर केला आहे.

नगरपरिषदेच्या प्रथेनुसार मुख्य कार्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते, तर पाणीपुरवठा केंद्र, नगरपालिका दवाखाने तसेच नगरपालिका संचलित द-शि विद्यालय व म्युनिसिपल हायस्कूलमध्ये संबंधित समिती सभापतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून अखंड सुरू आहे.

मात्र यंदा नगराध्यक्षांनी द-शि विद्यालय व म्युनिसिपल हायस्कूल येथे स्वतःच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा आदेश काढल्याने हा वाद उफाळून आला आहे. हा निर्णय म्हणजे राजकीय कुरघोडी असून परंपरेचा भंग असल्याचे लोणारी यांनी म्हटले आहे.

“देशाच्या प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी अशा प्रकारचे राजकारण करणे निषेधार्ह आहे. सभापतींना ध्वजारोहण करू न देण्याचा आदेश चुकीचा असून याचा मी तीव्र निषेध करतो,” असे युवराज लोणारी यांनी स्पष्ट केले.

तसेच, “राजकीय मतभेद असले तरी देशप्रेमापोटी आम्ही सर्वजण ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.

या घटनेमुळे भुसावळ नगरपरिषदेतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले असून या प्रकरणावर पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.