भुसावळ नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण :

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय सफाई कामगार संघटना (रजि. नवी दिल्ली) यांच्या वतीने २ फेब्रुवारी २०२६ रोजी भुसावळ नगरपरिषद आवारात आमरण उपोषण करण्यात येणार आहे. हे उपोषण महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष बाबू थामेत यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

याबाबत संघटनेने भुसावळ नगरपरिषद प्रशासनाला औपचारिक पत्र देत उपोषणास परवानगी मागितली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, मागील अनेक वर्षांपासून सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पत्रव्यवहार, भेटीगाठी व आंदोलने करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नाही.

यापूर्वी १० जून २०२५ रोजी आमरण उपोषण, तसेच १ ते ८ जुलै २०२५ दरम्यान पुनरामरण उपोषण करण्यात आले होते. त्यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्याने १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

संघटनेचा आरोप आहे की, भुसावळ नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या बहुसंख्य सफाई कर्मचारी हे मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती तसेच वाल्मिकी–मेहतर समाजातील असून त्यांना अपमानास्पद वागणूक, अन्यायकारक सेवा अटी आणि हक्कांची पायमल्ली सहन करावी लागत आहे. मागासवर्गीय आयुक्तांनी ताकीद दिल्यानंतरही आवश्यक अहवाल सादर करण्यात आलेला नाही, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

उपोषणाच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

शासन निर्णयानुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या राहत्या घरांचे हक्क त्यांच्या नावावर करणे

क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार नवीन पदांची भरती

वाढत्या कामाच्या तुलनेत कर्मचारी संख्येत वाढ

सेवाज्येष्ठतेनुसार मुकदम पदोन्नती

लाड-पागे समितीच्या प्रलंबित शिफारशींची अंमलबजावणी

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान, पेन्शन व अन्य देयके तात्काळ देणे

अतिरिक्त कामाचा योग्य मोबदला

संघटनेच्या पत्रव्यवहारास त्वरित प्रतिसाद

सफाई कर्मचाऱ्यांबाबतच्या निर्णय प्रक्रियेत संघटनेचा सहभाग व मान्यता

न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याचे दुष्परिणाम शासन, प्रशासन व नगरपरिषदेला भोगावे लागतील, असा इशाराही संघटनेने दिला आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्क, सन्मान व न्यायासाठी हे आंदोलन असून अखिल भारतीय सफाई कामगार संघटना या लढ्याला पूर्ण पाठबळ देईल, असे संतोष थामेत यांनी स्पष्ट केले आहे.