भुसावळ (प्रतिनिधी):
भुसावळ तालुक्यातील किन्ही-शिरपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या नमो एनर्जी ऑईल कंपनीच्या गोदामावर भुसावळ तालुका पोलीस व पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत तब्बल ३० हजार लिटर डिझेलसदृश ज्वलनशील पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, या प्रकरणात गुजरात राज्याशी संबंधित कनेक्शन उघड झाल्याने तेल भेसळ माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

रविवारी दि. १८ जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार किन्ही एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक F-50/51 वरील नमो एनर्जी ऑईल कंपनीत संशयास्पद इंधन साठवणूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तहसीलदारांच्या आदेशान्वये पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे व त्यांच्या पथकाने दुपारी ११.३० वाजता पंचासमक्ष धाड टाकली.
कारवाईदरम्यान GJ-24 V-7655 क्रमांकाचा टँकर आढळून आला. तपासणीदरम्यान टँकरमधील द्रव पदार्थाला डिझेलसारखा तीव्र वास येत असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी उपस्थित असलेले कंपनी मालकाचे भाऊ अमीन इक्बाल तेली (रा. सुरत) यांच्याकडे चौकशी केली असता समाधानकारक माहिती मिळाली नाही. टँकरचा चालकही घटनास्थळी अनुपस्थित होता.
अधिकाऱ्यांनी इंधनाची घनता (Density – 712) व तापमान (20°C) मोजले. हा पदार्थ बायोडिझेल की भेसळयुक्त डिझेल याची खातरजमा करण्यासाठी नमुने सीलबंद करून प्रयोगशाळेत (CA) पाठवण्यात आले आहेत.
या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा टँकर व २१ लाख रुपये किमतीचे ३० हजार लिटर इंधन (७० रुपये प्रति लिटर दराने) असा एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टँकर सध्या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सुरक्षिततेसाठी हलवण्यात आला आहे.
ही कारवाई पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे, उपनिरीक्षक रवी नरवडे, हवालदार उमाकांत पाटील, गोपाळ गव्हाणे, रतन परदेशी, विकास सातदिवे, राहुल वानखेडे तसेच भुसावळ तालुका पोलीस पथकाने केली. पंच म्हणून तलाठी मनीषा बरडिया व प्रमोद ठोसर उपस्थित होते.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोर व तेल माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



