संत गाडगेबाबा रुग्णालय वाचविण्यासाठी भाजपचे ठिय्या आंदोलन : तोडफोड थांबवली; मुख्याधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना :

भुसावळ (प्रतिनिधी) –

भुसावळ नगरपरिषदेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात नगरपरिषदेचे दप्तर व संपूर्ण प्रशासकीय कारभार तातडीने स्थलांतरित करण्याच्या घोषणेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी केलेल्या या घोषणेला भाजपने तीव्र विरोध दर्शविला असून, आज दि. १९ जानेवारी २०२६ भाजप गटनेते युवराज लोणारी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.

नगरपरिषदेने या स्थलांतरासंदर्भात कोणताही अधिकृत ठराव किंवा लेखी आदेश काढलेला नसतानाही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला.

आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी तोंडी आदेश दिल्यानुसार मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी नगरपरिषदेच्या अभियंत्यांसह संत गाडगेबाबा रुग्णालयास भेट दिली. यावेळी रुग्णालयातील सुरू असलेले तोडकाम तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले.

भेटीदरम्यान रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये डॉ. तौसिफ खान रुग्णांची तपासणी करत असताना, त्याच इमारतीत तोडफोड व दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे रुग्णसेवेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून, बेकायदा कारवाई होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणावर अधिक चर्चा व निर्णयासाठी मुख्याधिकारी राजेंद्र फातले हे तातडीने नगरपरिषदेचे अभियंते सोबत घेऊन संत गाडगेबाबा रुग्णालयात भेट दिली व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना झाले असून, येत्या काही तासांत प्रशासनाची अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करताना म्हटले की, “संत गाडगेबाबा रुग्णालय हे रुग्णांसाठी आहे, नगरपरिषदेच्या दप्तरासाठी नाही. रुग्णांना कोंडवाड्यात उपचारासाठी पाठवायचे आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भुसावळ नगरपरिषदेत सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच निर्माण झालेल्या या वादामुळे शहरातील राजकीय तणाव वाढला असून, स्थानिक नागरिक व रुग्णांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.