अशफाक खान यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार :

भुसावळ (प्रतिनिधी) – क्रांतिकारी शिक्षक संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथील आजम कॅम्पस येथे आयोजित भव्य समारंभात भुसावळ येथील अलहिरा उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक अशफाक खान रशीद खान यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी अशफाक खान हे आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते.

अशफाक खान यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात उर्दू शिक्षणाच्या प्रसारासाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत क्रांतिकारी शिक्षक संघटना महाराष्ट्रने त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड केली.

या समारंभास संघटनेचे पदाधिकारी, राज्यातील विविध जिल्ह्यांतील शिक्षक, शिक्षणप्रेमी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना अशफाक खान यांनी हा सन्मान संपूर्ण शिक्षकवर्गासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

दरम्यान, भुसावळ नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी शेख परवेज अहमद यांनी अशफाक खान यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.