जळगाव – जळगाव महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. ‘आमचे उमेदवार गरीब आहेत पण निष्ठावान आहेत. कारण त्यांनी माघारीसाठी मिळालेली ३५ लाखांची ऑफर धुडकावून लावली आहे. सर्वच लाेक पैशांवर विकले जात नाहीत असा सदेश गाेरगरीब उमेदवारांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे अशा शब्दात माजी आमदार संताेष चाैधरी यांनी विराेधकांचा खरपूस समाचार घेतला.
रविवारी समतानगर भागात आयाेजित जाहीर प्रचार सभेत चाैधरी हे बाेलत हाेते. व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे, भुसावळच्या लाेकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. जळगावातील मेहरुण, महाबळ, समतानगरसह माेठा परिसर सन २००५मध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघात हाेता. त्यामुळे हा परिसर ताेंडपाठ आहे. इथली माणसं जीवाला जीव देणारी आहेत असेही चाैधरी यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनात महापालिकेत कमीत कमी १५ ते २० नगरसेवक निवडून येतील असा अंदाज आहे. इतके नगरसेवक जर निवडून आले तर विराेधकांची झाेप उडवलीच समजा. कारण पुढे सत्ता स्थापनेसाठी काय करायचे याचा अनुभव मला आणि नाथाभाऊंना चांगला आहे असेही संताेष चाैधरी म्हणाले.

मलिदा लाटणारी टाेळी सक्रीय
जळगावात सत्ताधाऱ्यांनी आधी रस्ते केले. आता ते खाेदून जलवाहिनी टाकली. पुन्हा रस्ते केले जातील. त्यानंतर पुन्हा भूयारी गटारीसाठी रस्ते खाेदले जातील. हा सगळा खेळ टेंडरमध्ये मलिदा लाटण्यासाठी सुरू आहे. एक विशिष्ट टाेळी इथे सक्रीय आहे. तिचा बंदाेबस्त करण्याची हीच याेग्य वेळ आहे. मध्यंतरी आमच्या एका उमेदवाराला महायुतीच्या नेत्यांकडून माघारी घेण्यासाठी धमक्या दिल्या जात हाेत्या. मात्र, त्याने भीक घातली नाही. संताेष चाैधरी यांच्याशी बाेलून घ्या मी अर्ज माघारी घेताे असा निराेप संबंधिताला दिला. मात्र, माझे नाव ऐकून ताे पुढारी नंतर आमच्या उमेदवाराला भेटलाच नाही असा किस्साही संताेष चाैधरी यांनी सांगितला.
सत्ताधाऱ्यांना पैशांचा माज : एकनाथ खडसे
जळगाव महापालिका निवडणुकीत पैशांचा पूर आला आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना पैशांची प्रलाेभने दाखवली गेली. दमदाटी गुंडगिरीने दहशत माजवली गेली. त्यामुळे बारा नगरसेवक बिनविराेध निवडून आले. हिंमत असेल तर जसे सुरेशदादा जैन आणि मी निवडणुका लढलाे तशा लढवून दाखवा. राजकारण विचाराने केले पाहिजे. दमदाटीने नाही असा टाेलाही एकनाथ खडसे यांनी विराेधकांना लगावला. इथले राजकारण इतके घाणेरडे झाले आहे की किळस वाटायला लागली आहे. उमेदवारांना माघारीसाठी दहा लाख, वीस लाख रुपये दिले जातात हा कळसाध्याय आहे असेही ते म्हणाले.


