गोहत्या बंदीसाठी कठोर संकल्प : गोमातेला ‘राष्ट्रीय माता’ घोषित करण्याची मागणी : भुसावळचे गोसेवक रोहित महालेंचे जन्मदिनी एक वेळचे जेवण त्यागून आंदोलनास सुरुवात :


भुसावळ (प्रतिनिधी) –
देशभरात तसेच राज्यात गोहत्या थांबण्याचे नाव घेत नसल्याने गोभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गोवंश संरक्षणासाठी कायदे अस्तित्वात असतानाही गोतस्करी व गोहत्यांचे प्रकार सर्रास सुरूच असून, गोरक्षकांवर होणारे हल्लेही चिंतेचा विषय बनले आहेत. काही राज्यांत गोमातेला ‘राज्य माता’चा दर्जा देण्यात आला असला, तरीही कसाई व गोतस्करांकडून बिनधास्तपणे गोहत्यांचे प्रकार सुरू आहेत.

आईच्या दुधानंतर मानवाला जिवंत ठेवणाऱ्या गोमातेची आज निर्घृण हत्या होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशी गोमाता व गोवंश नष्ट होण्याच्या मार्गावर असताना, गोठ्यांतून चोरी करून गोवंशाची कोंबून वाहतूक केली जाते व त्यांची कत्तल केली जाते. ही अमानुष प्रथा समूळ नष्ट व्हावी, यासाठी संत नगरी शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या पावन भूमीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

भुसावळ येथील गोसेवक रोहित महाले यांनी गोहत्या बंदीसाठी आणि गोमातेला ‘राष्ट्रीय माता’चा दर्जा मिळावा, यासाठी कठोर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आपल्या जन्मदिनीच त्यांनी एक वेळचे जेवण त्यागून या आंदोलनाची सुरुवात केली.
“देवांनी दिलेला हा देह गोमातेच्या रक्षणासाठी अर्पण करण्याची माझी तयारी आहे. वारंवार निवेदने देऊनही न्याय मिळत नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आज घरोघरी असलेली गोमाता मोकाट व बेवारस झाली असून, रात्रीच्या वेळी गोतस्करांकडून तिची चोरी करून हत्या केली जाते. हे पाप कधी थांबणार? असा सवाल उपस्थित करताना महाले यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. गोभक्तांनी त्यांना हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली असता, “आता वेळ आली आहे, मी थांबणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महाले यांनी इशारा दिला आहे की, गोहत्या थांबल्या नाहीत, तर आज एक वेळचे जेवण सोडले आहे, उद्या दोन वेळचे पाणी व जेवण त्यागण्याचा निर्णय घेतला जाईल. तेव्हा तरी गोभक्तांना न्याय मिळेल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
गोमातेच्या रक्षणासाठी उचललेला हा पवित्र लढा समाज, प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.