जळगाव महापालिकेमध्ये संताेष चाैधरी एकहाती लढवताहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा किल्ला !रणसंग्राम : गृहभेटींसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जळगावात ठाेकला तळ :

उज्ज्वला बागुल : जळगाव
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती भक्कम आहे. त्यांच्या विराेधात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती आहे. शरद पवार गटाचा किल्ला भुसावळचे माजी आमदार संताेष चाैधरी हे लढवताहेत. राज्यस्तरावरून पाहिजे तशी रसद पुरवठा जळगावात हाेताना दिसत नाही. मात्र, असे असले तरी पक्षाचे तुतारी चिन्ह शहरात घराेघरी पाेहाेचवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. अद्यापपर्यत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रीया सुळे यांच्यापैकी एकाचीही सभा झालेली नाही. दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेने उद्याेगमंत्री उदय सामंत यांचा राेड शाे घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. पुढील दाेन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या सभांचेही नियाेजन सुरू आहे.

प्रभारी जबाबबदारी पार पाडणार
जळगाव महापालिकेचे प्रभारी म्हणून शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाची जबाबदारी संताेष चाैधरी यांच्या खांद्यावर टाकली आहे. त्या दिवसापासून चाैधरी हे दरराेज जळगावात सकाळ ते संध्याकाळ तळ ठाेकून आहेत. आपल्या उमेदवारांना प्रतिसाद वाढावा म्हणून ते पायी प्रचार फेऱ्यांत सहभागी हाेताहेत. तरुणांनाही लाजवेल असा उत्साह त्यांच्यात दिसताे आहे. एकाच वेळी मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे निवडणुकीत रंजकता आली आहे. अन्यथा, ही निवडणूक जवळपास एकतर्फी झालेली हाेती. किमान त्यांच्यामुळे तरी महायुतीला सभा, राेड शाे करून शक्तीप्रदर्शन करावे लागते आहे.

ठाकरे सेनेचे सेनापती मुंबईत
ठाकरेंच्या शिवसेनेनेही येथे ३०पेक्षा अधिक उमेदवार दिले आहेत. त्यापैकी काहींनी लढण्यापूर्वीच माघारी घेतली आहे. त्यातच महायुतीचे तब्बल १२ उमेदवार बिनविराेध झाले आहेत. त्यामुळे ठाकरे सेनेचे इथले संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी माघारीनंतर चित्र स्पष्ट झाल्यापासून आपला मुक्काम मुंबईकडे हलवला आहे. त्यामुळे त्यांचे उमेदवार वाऱ्यावर आहेत. महानगर जिल्हाप्रमुख तथा माजी उपमहापाैर कुलभूषण पाटील आणि शहरप्रमुख शरद तायडे हे दाेघे किल्ला लढवण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, त्यांच्या स्वत:च्या प्रभागातच त्यांना माेठै आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे इतर उमेदवारांसाठी त्यांना अपेक्षित असा वेळ देता येणे शक्य हाेत नसल्याचे चित्र आहे.

माजी महापाैर विष्णू भंगाळेंना आव्हान
माजी महापाैर विष्णू भंगाळे हे शिवसेनेचे ताकदवान उमेदवार आहेत. त्यांना माजी नगरसेवक स्वर्गीय नरेंद्र भास्कर पाटील यांचे सुपूत्र पीयूष पाटील यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. दाेन दिवसांपूर्वी भंगाळे यांना त्यांच्या प्रभागात महिलांच्या संतापाला सामाेरे जावे लागले आहे. लाेकांची कामे हाेत नसल्याची ओरड संबंधित महिलेने केली हाेती. त्यानंतर हा व्हीडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. प्रभागात या संदर्भात चर्चा झाल्याने भंगाळे यांनी हा विराेधकांचा स्टंट असल्याची बतावणी केली आहे. माजी महापाैर नितीन लढ्ढा यांच्यासाठीही यंदाची निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे. माजी महापाैर जयश्री महाजन व त्यांचे पती सुनील महाजन यांनाही प्रचंड ताकद लावावी लागते आहे.