भुसावळात नायलॉन मांजाविक्रीवर पोलिसांचा छापा; श्रीराम नगरातील इसम अटकेत

भुसावळ (प्रतिनिधी ) -: शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री केल्याप्रकरणी भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात पोलिसांनी छापा टाकून एका इसमास अटक केली. ही कारवाई शुक्रवार, १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीन ते साडेचारच्या सुमारास करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे कार्यरत पोलीस कर्मचारी राहुल वानखेडे यांच्या फिर्यादीनुसार, गुप्त बातमीदारामार्फत श्रीराम नगर भागात नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रवि नरवाडे, पोलीस नाईक उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने पंचांसह खासगी वाहनाने घटनास्थळी छापा टाकला.

श्रीराम नगर परिसरातील हनुमान मंदिराजवळील मोकळ्या जागेत काशीनाथ देवीदास राठोड (वय ४८, रा. श्रीराम नगर, भुसावळ) हा इसम नायलॉन व पक्क्या धाग्यापासून बनवलेला मांजा विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून हिरव्या, काळ्या व नारंगी रंगाच्या नायलॉन मांजाचे एकूण चार बंडल जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत चार हजार रुपये आहे.

नायलॉन मांजामुळे मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, याची पूर्ण जाणीव असूनही केवळ आर्थिक फायद्यासाठी त्याची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पंचनामा करून जप्त केलेला मुद्देमाल सील करण्यात आला असून आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५, २२३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम ५ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रविकिरण झाल्टे करीत आहेत.