प्रचारासाठी नेलेल्या पैशांवरून महिलांमध्ये तुफान राडा -नाशिक शहरातील घटनेची सर्वत्र चर्चा

नाशिक (प्रतिनिधी )-

महापालिका निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू असताना नाशिक शहरात एक अजब आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रचारासाठी नेण्यात आलेल्या महिलांना रोजंदारीचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना सिडको परिसरात घडली असून, या घटनेची शहरभर चर्चा सुरू आहे.

नाशिकच्या सिडको भागातील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी सुमारे ६५ महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, दुसऱ्या उमेदवाराच्या प्रतिनिधीने अधिक हजेरी (रोजंदारी) देण्याचे आमिष दाखवले. अधिक पैसे मिळतील या अपेक्षेने या महिलांनी पहिल्या उमेदवाराचा प्रचार सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला.

मात्र दिवसभर महिलांना एकाच ठिकाणी बसून ठेवण्यात आले. दुपारनंतर त्यांना परत जाण्यास सांगण्यात आले. कोणतीही रोजंदारी न दिल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. यावरून महिलांमध्ये व प्रतिनिधी महिलेमध्ये आधी शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर झटापट व मारामारी झाली.

विशेष म्हणजे, ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी महिलांना नेण्यात आले होते, त्या उमेदवाराने सायंकाळी फोन बंद ठेवल्याचेही समोर आले आहे. काही महिलांना अश्रू अनावर झाले, तर काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हाताशी आलेले काम सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या आमिषाला बळी पडल्याने महिलांना मोठा फटका बसला असून, या घटनेतून चांगलाच धडा मिळाल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. प्रचारासाठी मजूर व महिलांचा वापर आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या आश्वासनांबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.