भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपरिषदेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) ने महत्त्वाची संघटनात्मक पायरी पार केली आहे. पालिका निवडणुकीनंतर पक्षाच्या नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. यावेळी गटनेतेपदी सचिन संतोष चौधरी, उपगटनेतेपदी सोहेल खान पठाण तर प्रतोदपदी उल्हास पगारे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

गट नोंदणीमुळे पक्षाला बळ
मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. या गट नोंदणीमुळे भुसावळ नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची संघटनात्मक आणि राजकीय ताकद अधिक भक्कम झाली असून आगामी निर्णयप्रक्रियेत पक्षाला ठोस भूमिका घेता येणार आहे.
सचिन चौधरीकडे नेतृत्वाची धुरा
नगरसेवक गटनेते म्हणून सचिन संतोष चौधरी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर उपगटनेतेपदाची धुरा सोहेल पठाण यांच्याकडे आणि प्रतोदपदाची जबाबदारी उल्हास पगारे यांच्याकडे देण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांना विश्वासात घेऊन विकासकामे – नगराध्यक्षा
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी सांगितले की, “भुसावळ नगरपरिषदेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमच्यावर आहे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन एकसंघपणे विकासकामे राबवून नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

जनतेसाठी अहोरात्र काम करण्याचे आश्वासन – सचिन चौधरी
नवनियुक्त गटनेते सचिन संतोष चौधरी यांनी भुसावळकर जनतेला आश्वस्त करताना सांगितले, “शहराच्या विकासासाठी दिवस-रात्र काम करण्याची तयारी आहे. या जबाबदारीसाठी माजी आमदार संतोष चौधरी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे तसेच सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार.”
राजकीय स्थैर्याला बळ, विकासाला गती
या गट नोंदणीमुळे नगरपरिषदेत राजकीय स्थैर्य निर्माण होणार असून विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



