शिक्षा शिरोमणी पुरस्काराने सौ. पूनम फालक यांचा सन्मान

भुसावळ (प्रतिनिधी ) -:
येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या आदर्श शिक्षिका, शाहू महाराज नारी रत्न पुरस्कारप्राप्त व जयलक्ष्मी अ‍ॅकॅडमीच्या प्रमुख आधारस्तंभ सौ. पूनम विजय फालक यांना वर्ल्ड सेवन वंडर्स रेडीयन्ट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या नामांकित संस्थेतर्फे शिक्षा शिरोमणी पुरस्काराने गौरविण्यात आले.

सौ. फालक यांनी शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आधारे संस्थेने ही निवड केली. गेल्या पंधरा वर्षांपासून ही संस्था साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, कला, संगीत आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण भारतातून निवड करते. प्रत्येक क्षेत्रातून केवळ पाच मान्यवरांचीच निवड केली जाते.

नागपूर येथे झालेल्या २३ व्या संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूरचे श्रीमंत राजे मुधोजीराव भोसले, तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, भारत सुंदरी साहित्यिक व प्राध्यापिका डॉ. रूपाली वशिष्ठ, क्रीडा शिक्षक डॉ. पंढरीनाथ रोकडे, डॉ. दिगंबर तायडे, संस्थेचे संस्थापक डॉ. क्रांती महाजन व सौ. आशा महाजन यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संघर्षमय जीवनातून वाट काढत विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षणाचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल सौ. फालक यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. कुटुंब, समाज व शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम सर्वत्र प्रशंसनीय ठरले आहेत.

पुरस्कार स्वीकारताना सौ. पूनम फालक यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत हा सन्मान म्हणजे समर्पित भावनेने केलेल्या कर्माचे फळ असल्याचे सांगितले. या यशाचे श्रेय त्यांनी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, ताप्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच जयलक्ष्मी अ‍ॅकॅडमीच्या संचालक व कर्मचाऱ्यांना दिले.

या सन्मानाबद्दल सौ. पूनम फालक यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.